Our Dreams - Our Realities

Our Stories

  देहने 

  ठाणे म्हटलं  की ठाणे शहर आणि तेथील गर्दी, धूर, इमारती हेच चटकन डोळ्यासमोर येतं. पण याच ठाणे जिल्ह्यात अफाट नैसर्गिक सौंदर्याचं व सुंदर माणसांनी भरलेलं एक छोटसं गाव वसलं आहे- देहने.

       ४-५ तास आगगाड़ीने, खूप लोकं, आवाज, व थकवून टाकेल असा प्रवास केला आणि माझ्या अपेक्षा अगदीच उंचावल्या. आणि हो. जीप ने देहनेच्या दिशेने जातानाच मला कळलं की पुढचे ३ दिवस इथला निसर्ग माझे डोळे दिपुन टाकणार आहे.

         लाल, तांबूस रंगाचे भव्य डोंगर. असामान्य आकारांच्या या पर्वतरांगा. काही मोठे काही छोटे, काही गोलावलेले तर काही टोकदार डोंगर. बाकीच्या जगापासून आपले रक्षण करणाऱ्या या रांगा व त्यांवर फक्त अणि फक्त निळे आकाश. अश्या या नेत्रसुखद घुमटाच्या  कुशीत हे गाव. इथे भात सोडून काहीच पिकत नाही. शेती सोडून कोणताच व्यवसाय केला जात नाही. खूप खूप सोपं व काटकसरीचं जीवन जगलं जातं. शुद्ध व निर्मळ हवा व परिसर. छोटी, रंगीत घरं व हिरवी, दाट झाडं. एक विनयशील अनुभव.     

  गावात फक्त ४० कुटुंब. इतक्या कमी लोकांना बघायची सवयंच नसते आपल्यासारख्या शहरात राहणाऱ्यांना! या मुठभर लोकांना एकाच पद्धतीने वाढवलेलं. सर्वांची एकच जीवनशैली. सर्वांचा शिष्टाचार सारखा व सर्वांची बोली सारखी. सर्वं- एकच.

       साध्या  व खूप चवदार जेवणानी सर्व कुटुंबांनी आमचं स्वागत केलं. सावळ्या वर्णाचे आणि बुजऱ्या स्वभावाचे आमचे पाहुणचार करणारे. स्वतः प्रश्न विचारणार नाहीत पण प्रश्न विचारल्यावर उत्तर द्यायला घाबरतसुद्धा नाहीत, अशी ही लोकं . दुसऱ्याच दिवशी आम्ही आजोबागड नावाच्या एका गडावर गेलो. आमच्याबरोबर गावातील ताई, दादा होते, व पूर्ण वेळ आम्हाला मदत करत होते. नुसतीच मदत नाही तर आम्हाला काय करा व काय करू नका हे पण सांगत होते. आमच्यापैकी निम्म्या जणांनी तरी कधीच इतका वेळ निसर्गाच्या सन्निध्यात घालवला नसेल. हा नवीन अनुभव आमच्यासाठी सुखदायी व शैक्षणिक करण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. वरती पोहोचल्यावर ओढ्याचं शुद्ध व निर्मळ पाणी आपल्याच पूर्वजांच्या (माकडांच्या) सोबतीत पिऊन ताजातवानं होऊन खूप बरं वाटलं. मग मात्र कष्ट करायची वेळ. शून्यापासून ५० जणांसाठी अन्न बनवायची वेळ. सरपण आणून चूल बनवण्यापासून ते भाज्या चिरून आमटी भात, वांग्याचा रस्सा व कोशिंबीर हे सर्व आम्ही केलं. दोन-अडीच तास यावर घालवल्यावर त्या अन्नांची चव फारच गोड होती.

       गडावरच असताना आम्ही ५० जणांनी १०-१२ मोठ्या कचऱ्याच्या पिशव्या भारतील इतका कचरा गोळा करून खाली नेला. कचरा गोळा करतांना आमच्या सर्वांच्या मनात कचरा करणाऱ्यांबद्दल राग, निराशा होतीच. त्याचबरोबर  स्वतःबद्दल अभिमान होता. कुठेही तिरस्कार किंवा किळस नव्हती. आपल्या पृथ्वीबद्दल प्रेम अणि आदर होता. इतकंच. 

  तिसऱ्या दिवशी मात्रं आम्हाला खऱ्या गावकऱ्यांच्या जीवनशैलीचा अनुभव मिळाला. एक भाकरी बनवण्यासाठी ऊखळ-मुसळ वापरून, पाखडून, जात्यावर दळून, पीठ मळून, थापून, भाकरी बनवण्याचा अनुभव आला. गांडूळ-खत प्रकल्पाची माहिती मिळाली. नंतर आम्हाला सांगितलं की तुम्हाला काही दांड्या, काही पानांच्या फांद्या व थोडं पाणी दिलं जाईल, तुम्ही निवारा अणि चूल बनवून दाखवा. मी  विचार केला, ‘काय! निवारा अणि चूल बनवा! एका तासात! काहीपण!’ पण काय आश्चर्य! ओल्या मातीची चूल व काही काळ सूर्यापासून रक्षण कारु शकेल असा निवारा व चूल आम्हाला सर्वांनाच करता आली! त्यानंतरचा आनंद तर काय सांगू! शहरी लोकांना याची कधीच गरज पडत नाही. कधीही निवाऱ्याची गरज पडू शकेल असं वाटत सुद्धा नाही. पण या गावकऱ्यांना मात्रं या सर्वं गोष्टींची कधीही गरज पडू शकते अणि ते त्यासाठी कायमच तैयार असतात. जे आमच्यासाठी साहस होतं तेच त्यांच्यासाठी एक आवश्यक कौशल्य होतं.

   

   

    पुढच्या दिवशी लहान मुलांना भेटी देत, त्यांच्यासाठी पपेट शो करत, श्रमदान करत वेळ कसा गेला ते कळलं सुद्धा नाही. पण आमच्या, हो आमच्या ‘स्वतःच्या’, कुटुंबामधे शेवटचं जेवण करून निघताना मन काहीसं उदास होतं. रोज आम्ही थकलेली भागलेली मुले काळा चहा आवडीने  पीत होतो. रोज शेकोटीभोवती गप्पा मारत होतो. आणि ह्या आगळ्या वेगळ्या जीवनाचा विचार करून परत आमच्याच दैनंदिन आयुष्याकडे वळत होतो . आपण आता परत शहरात जाणार ह्याचे कुठेतरी बरं पण वाटत होतं. पण त्याचं कारण म्हणजे आपलं शहरी आयुष्य किती सोप्पं आहे याची एक नवीन जाणीव झाली होती. ताज्या हवेचं महत्त्व कळलं होतं, पृथ्वीला मदत करायची व परंपरा जागृत ठेवण्याची एक नवी इच्छा मनात उमगली होती हे मात्र नक्की.

   

  Sai Khare - Our alumni